बल्लारपूर बायपासवरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाखांच्या धनादेशांचे वितरण

चंद्रपूर, दि. 23/11/2023 : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 20 लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. अपघातानंतर श्री. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मिळवून दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यांच्या आत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळू शकली आहे.

अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे ,  कल्पना बगुलकर, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत आदी उपस्थित होते.

27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मदत जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच धनादेश जारी करण्यात आले आणि सोमवारी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांना हे धनादेश सुपूर्दही करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख विसरणे शक्य नाही, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत श्री. मुनगंटीवार यांनी संकटाच्या काळात दिलासा देण्याचे काम केले आहे, अशी भावना मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

वीस दिवसांच्या आत घोषणा

श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 20 दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button