गोरेगावातील जय भवानी सोसायटीच्या रहिवाश्यांची १५ दिवसांत निवास व्यवस्था करणार – मंत्री अतुल सावे
नागपूर, दि. 16 : मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील जय भवानी एसआरए गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाश्यांची १५ दिवसात निवास व्यवस्था केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य विद्या ठाकूर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.
ते म्हणाले, जय भवानी इमारत आगीत ७ जणांचा मृत्यू, ५१ जण जखमी झाले होते. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र २०१३ मध्ये दिले होते. त्याला अग्निशमन विभागाची एनओसी होती. एस आर एच्या नियमानुसार कोणत्याही इमारतीचा डिफेक्ट लायबिलिटी कालावधी तीन वर्षांचा असतो. दहा वर्षापर्यंत इलेक्ट्रिकल, फायर फायटिंग सिस्टिम मेंटेनन्सची जबाबदारी विकासकांची असते. ही घटना घडली त्यावेळी दहा वर्षे होऊन गेले होते. मेंटेनन्सची जबाबदारी सोसायटीची होती. यापुढे नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री सावे यांनी यावेळी सांगितले.
या इमारत दुर्घटनेवेळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यांनी मृत आणि जखमींना मदत जाहीर केली. शिवाय राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत दिली आहे. ही मदत मिळाली नसल्यास अधिवेशन संपण्यापूर्वी मदत देण्याची व्यवस्था केली जाईल,असेही मंत्री श्री. सावे यांनी सभागृहात सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य प्रा. वर्षा गायकवाड, सदा सरवणकर, दिलीप लांडे, संजय केळकर यांनी सहभाग घेतला.