कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर दि. 12/12/2023 :- कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित
तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल, आरोग्य, महिला व बालकल्याण व कामगार विभागाच्या
सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावी, असे निर्देश
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
कला केंद्रांबाबत एसओपी तयार करणे संदर्भात विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण
व पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे पोलीस
अधीक्षक नंदकुमार ठाकूर, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अहमदनगर पोलीस अधीक्षक
राकेश ओला, लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, कलाताई शिंदे, सुनीताताई मोरे उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या समस्या
सोडविण्यासाठी भरोसा सेल, महिला दक्षता समितीसह पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील
अधिकाऱ्यांनी या केंद्रांना नियमित भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कला केंद्राच्या ठिकाणी
महिला राहत असलेल्या ठिकाणीची जागा सुरक्षित आहे का यासह केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडत
नसल्याची खात्री करावी. याबरोबरच कला केंद्रांवर कोणतेही अवैध व्यवसाय होत नाही याची खातरजमा
करावी. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व
बाल विकास विभागाची मदत घ्यावी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोविड मध्ये विधवा महिलांना मदत करण्यासाठी समिती केली होती. त्याच
धर्तीवर कला केंद्रातील मुलींसाठी समिती नेमून त्या दृष्टीने त्या मुलींचे पुनर्वसन करण्यावर भर देता येईल.
कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या अल्पवयीन मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना
विश्वासात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच कला केंद्रांवर काम करणाऱ्या कलाकारांच्या
सामाजिक पुनर्वसनासाठी त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी कामगार विभागामध्ये जशी
कामगारांची नोंदणी केली जाते त्याच पद्धतीने कला केंद्रावरील कलाकारांची नोंदणी कामगार विभागाने
करावी. यामधे तमाशा, लोक कलावंत, कला केंद्रावरील महिलांचा समावेश करावा, अशा सूचनाही त्यांनी
दिल्या. बैठकीत संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यातील कला केंद्राच्या
सद्य:स्थितीची माहिती दिली.