३१ रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन महिनाभरात बसविणार- मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत


३१ रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन महिनाभरात बसविणार– मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
नागपूर, दि. 15 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व ३१ रक्तपेढयांमध्ये ॲलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र) येत्या महिन्याभरात बसवण्यात येईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. याशिवाय खासगी रक्तपेढ्यांनाही असे ॲलिकॉट मशीन बसविण्याची सक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सभागृहात आज सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नसल्यामुळे रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्तपेढ्यांमध्ये ॲलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र उपलब्ध असणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढ्यांपैकी सध्या केवळ ८ रक्तपेढ्यांध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी केवळ ३ ठिकाणी ॲलिकॉट मशीन ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र महिनाभरात हे मशीन बसविण्यात येईल, असे त्यांनी संगितले.
ॲलिकॉट मशीनचे तंत्रज्ञान हे नवीन नाही. ॲलिकॉट मशीन हे लहान यंत्र असून रक्ताची ३५० मि.ली.ची पूर्ण बॅग गरजेप्रमाणे विभाजन करुन बाल रुग्णांना अचूक तेवढेच रक्त देण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या कार्यरत असलेले रक्त केंद्र तंत्रज्ञ ही मशीन वापरु शकतात, अशी माहितीही यावेळी प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.
पदभरती प्रक्रिया लवकरच पूर्ण
सार्वजनिक आरोग्य विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीची पदभरती प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.
यावेळी सदस्य भास्कर जाधव, योगेश कदम, प्रणिती शिंदे, अनिल देशमुख, देवयानी फरांदे, प्रकाश आबिटकर, सुलभा खोडके, राजन साळवी, मनीषा चौधरी आणि रत्नाकर गुट्टे यांनी उपप्रश्न विचारले.