नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी ऑनलाइन रिपोर्टिंग व्यवस्था उभारणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16: राज्यामध्ये रोहित्र नादुरुस्त होणे, रोहित्रांची क्षमता वृद्धी करणे तसेच विजेचा दाब वाढल्यामुळे रोहित्र जळणे आदी प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.  नादुरुस्त रोहित्र तीन दिवसांत दुरुस्त करून देण्यासाठी नवीन जलद प्रतिसाद मिळण्यासाठी ऑनलाइन रिपोर्टिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

            विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रोहित्र नादुरुस्तेची सूचना किंवा तक्रार ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी एका ॲपची निर्मिती करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून कुठलाही नागरिक रोहित्राबाबत ऑनलाइन तक्रार करू शकतो.  तक्रार केल्यानंतर तीन दिवसांत नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात येईल.  दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. ऑटो पॉप्युलेटेड पद्धतीवर ॲप असल्यामुळे वापरण्यास सुलभ आहे.

              उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रथमच अर्थसंकल्पात प्रथमच नादुरुस्त रोहित्र बदलवून देणे, रोहित्रांची क्षमता वृद्धी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आर.डी.एस.एस (रेव्हॅम्पड डिस्ट्रिब्यूशन सेक्टर स्कीम) या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज वितरण यंत्रणा अद्ययावत व नवीन यंत्रणा उभारण्यात येईल.  राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून  39 हजार कोटी रुपयांची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध कामे निविदा प्रक्रियेत आहेत. येत्या काळात वीज वितरण क्षेत्रात अतिरिक्त पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे . प्रत्येक जिल्ह्यालातालुक्याला या योजनेतून निधी दिला आहे.  औसा विधानसभा मतदारसंघात आरडीएसएस योजनेअंतर्गत  ३३/११ केव्ही क्षमतेची ७ उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहे. तसेच आर. डी. एस. एस योजनेंतर्गत ११ उपकेंद्राचे क्षमता वृध्दी करण्यात येणार आहे. नादुरुस्त 723 रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहे.

              या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्राजक्त तनपुरे, राम सातपुते, बाळासाहेब थोरात, संजय जगताप यांनी भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button