बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांना व्यापार वाढीस कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध !-उद्योग मंत्री उदय सामंत
बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांना व्यापार वाढीस कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नरत-उद्योग मंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालन’चे थाटात उद्घाटन
नवी दिल्ली, 14 :भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्यासाठी व देशासाठी अतिशय महत्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पाद सारख्या व्यापारांना चालना मिळेल व त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 42व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी केले.
राजधानीस्थित प्रगती मैदान येथे 42व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची आज पासून सुरुवात झाली. या मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते झाले. या मेळ्यात उभारला गेलेल्या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम व महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.
महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यापूर्वी उद्योग मंत्री श्री सामंत यांनी महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेतली व आंतरराष्ट्रीय मेळ्यात महाराष्ट्र दालनाच्या उभारणी विषयी तसेच सहभागी झालेल्या स्टॉल्स बद्दल माहिती दिली. यावेळी सांगताना, महाराष्ट्र दालनाची उभारणी व सजावट, प्रथमताच सर जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले असल्याचे माहिती दिली. तसेच महाराष्ट्र दालनात सहभागी झालेल्या सर्व कारागीरांची राहण्याची सोय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शासनामार्फत केली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील स्टार्टअप्सला गती देण्याचे धोरण, एक जिल्हा एक उत्पादन योजना, गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे व यासाठी सरकारकडून उचललेल्या सर्व आवश्यक पाऊलांची माहिती श्री सामंत यांनी प्रसार माध्यमांना यावेळी दिली. तद्नंतर प्रगती मैदान येथे त्यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केले व दालनात सहभागी झालेल्या सर्व स्टॉल्सना भेट देऊन, त्यांच्या उत्पादनाबाबती माहिती उत्सुकतेने जाणून घेतली.
27 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मेळ्याची थीम ′वसुधैव कुटुंबकम- युनिटी इन ट्रेड’ आहे. महाराष्ट्र पॅव्हेलियन देखील याच थीमवर आधारित आहे. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350व्या वर्ष असून याचे औचित्य साधत हे दालन सजवण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील स्टार्टअप्सला गती देण्याचे धोरण, एक जिल्हा एक उत्पादन योजना, गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न एका छताखाली पाहावयास मिळतील.
यंदाच्या दालनात, वसुदेव कुटुंमकम या विषयानुरुप एक ग्लोब तयार करण्यात आले असून, त्यावर एलईडीच्या सहायाने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगतीची चित्रफीत, चांद्रयान मोहिमेतंर्गत महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान तसेच शिवराज्याभिषेकाचा सेल्फी पांईट व होलोग्रॉफी टेक्नॉलॉजीचा वापर करुन शिवमुद्रा दालनाचे प्रमुख आकर्षण ठरले. एकूण 48 गाळे उभारण्यात आलेले असून, 8 गाळे शासकीय विभागांना त्यांच्या योजना प्रदर्शित करण्यासाठी देण्यात आलेले आहेत व 27 गाळे एम.एस.एम.ई, हस्तकला कारागीर, बचत गट व महिला उद्योजिकांना देण्यात आले आहेत. उर्वरित 12 गाळे एक जिल्हा एक उत्पादनातंर्गत उद्योजकांसाठी उद्योग संचालनालयांना देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र दालनातील गाळ्यांमध्ये कोल्हापूरी चपला, पैठणी साडी, चामड्यांच्या वस्तु, घर सुशोभी करण्याच्या वस्तु, हॅन्ड पेटिंग, एक जिल्हा एक उत्पाद उत्पादने, विविध क्लस्टर, काथ्या पासून बनविलेल्या विविध वस्तु तसेच विविध बचत गटातील महिलांनी बनविलेले खाद्य मसाले पदार्थ, इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या आहेत.
मागील वर्षी महाराष्ट्राला व्यापार मेळ्याचे भागीदार राज्य होण्याची संधी मिळाली होती. यावेळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली आणि इतर फोकस राज्ये आहेत. यंदाच्या मेळ्यात 28 राज्ये, केंद्र शासित प्रदेश व 13 देश सहभागी होणार असून, 3500 उद्योजक सहभागी होतील.
बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
000000000000000