मेणबत्ती कारखाना आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत – मंत्री सुरेश खाडे
मेणबत्ती कारखाना आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत – मंत्री सुरेश खाडे
नागपूर, दि. 15 : पुण्यातील तळवडे येथील शिवराज एंटरप्रायझेस येथे स्पार्कल कॅण्डल बनवित असताना अचानक लागली होती. या आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले.
८ डिसेंबर रोजी अचानक आग (फ्लॅश फायर) लागली होती. या घटनेत एकूण १५ महिला कामगारांपैकी ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिला कामगारांपैकी ९ जखमी कामगारांवर उपचार सुरु असताना त्यापैकी ३ कामगारांचा मृत्यू झाला. उर्वरित ६ महिला कामगार व एका पुरुष व्यक्तीवर उपचार सुरु आहेत, असे मंत्री श्री खाडे यांनी सांगितले.
ही आस्थापना तळवडे, पुणे येथील जन्नत नजीर शिकलगार यांच्या मालकीच्या जागेत शिवराज एंटरप्रायझेस या नावाने कार्यरत होती. या आस्थापनेचे बांधकाम हे अनधिकृत असून आवश्यक मान्यता घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या आस्थापनेने कारखाने अधिनियमांतर्गत परवाना घेतला नसल्याचे दिसून आले असल्याचे मंत्री श्री खाडे यांनी निवेदनातून स्पष्ट केले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. घटनेनंतर या आस्थापनेवर कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत विविध कायद्यांतर्गत निरीक्षण शेरे नोंदविण्यात आलेले असून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या आस्थापनेस उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगारमंत्री श्री खाडे यांनी सभागृहात दिली.
या प्रकरणी अग्निशमन विभागाकडून संबंधित पोलीस स्टेशनला आस्थापनेविरुध्द भारतीय दंड संहिता, बाल व किशोर कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम, १९८६ तसेच स्फोटक अधिनियम, १८८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारखान्याच्या जागेचे मालक, आस्थापनेचे मालक व उत्पादनासाठी कच्चा माल पुरवविणारे पुरवठादार यांना अटक करण्यात आली असून सद्यस्थितीत ते अटकेत आहेत.
कंपनीतील मृत व जखमी कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयुक्तांना कळविण्यात आले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. घटनेच्या अनुषंगाने पुढील चौकशी सुरु असून संबंधिताविरुध्द कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे कामगारमंत्री श्री खाडे यांनी यावेळी सांगितले.