खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर शासकीय रुग्णालयात दोन विभाग करण्याचा विचार – मंत्री हसन मुश्रीफ
नागपूर, दि. 21 : मोठ्या शहरांमध्ये असलेल्या खासगी रुग्णालयात प्रशासकीय व वैद्यकीय विभाग कार्यरत असतात. त्यामुळे डॉक्टरांना प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याची गरज नसते. याच धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालयात असे दोन विभाग करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य नाना पटोले, डॉ. राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, प्रतिभा धानोरकर, अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोविड काळात चंद्रपूर रुग्णालयात जेम पोर्टल माध्यमातून वैद्यकीय साहित्य व अनुषंगिक वस्तूंची खरेदी केली आहे. कोविड काळात इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्लॅन मधून खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून चंद्रपूर रुग्णालयात खरेदी देखील करण्यात आली आहे. याबाबत काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील वर्ग १, वर्ग २ रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एप्रिल २०२४ पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच वर्ग ३ संवर्गाच्या ५६०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत सुरू आहे. डिसेंबर अखेर आदेश निघणार आहे. तसेच वर्ग ४ पदांची भरती बाह्य तत्वाद्वारे लवकर करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.