अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार – मंत्री धर्मरावबाबा आत्राम
मुंबई, दि. ३ :- अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज अधिक गतीने व सुलभपणे होण्यासाठी विभागाकडील प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
मंत्री श्री. आत्राम यांनी आज त्यांच्या दालनात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरात, सहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवले, सहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्याबरोबरच फिरत्या प्रयोगशाळेसाठी १६ वाहने खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. या प्रयोगशाळा पिपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम गतीने व्हावे म्हणून विभागातील सह आयुक्त अन्न, औषध, सहाय्यक आयुक्त अन्न, औषध पदावरील पदोन्नतीची प्रकरणे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावीत. विभागाकडील पदे पुनर्जीवित करणे, नवीन पदांना मान्यता घेणे, वर्ग तीन व चार पदांची भरती प्राधान्याने करावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.