स्वच्छता मोहीमेत मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी संकल्प : स्वच्छ, सुंदर व हरित मुंबईचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई  प्रदूषणमुक्त, स्वच्छ व हरित करण्याचा ध्यास घेत आता मुंबई खड्डेमुक्तही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या‍ चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड) स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल,

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. एन विभागातील अमृतनगर सर्कल येथून सकाळीच या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. स्वच्छता करण्यासाठीचे ग्लोव्हज हातात घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अमृतनगर सर्कल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर एन विभागातील कामराज नगर व घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. एम पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टिळक नगर, भैरवनाथ मंदीर मार्ग, एफ उत्‍तर विभागातील भैरवनाथ मंदीर मार्ग, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ घेण्यात आली.

नागरिकांचा सहभाग

अतिरिक्त मनुष्यबळासह विविध संयंत्राच्या सहाय्याने वॉर्डातील कानाकोपऱ्याची स्व‍च्छता करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसह मुंबईकर नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग  घेतला.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई शहरांतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी ही स्वच्छता मोहीम प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता अभियानासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही मोहीम नक्कीच उपयुक्त ठरेल. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच जाणवेल. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभाग वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्यादृष्टीने मुंबई आपल्याला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवलीच पाहिजे असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपला दवाखाना याची संख्या वाढविण्यात येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन स्वच्छता मोहीमेच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

 

 

रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा मानस

राजावाडी हे रुग्णालय मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता 1000 बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत यासाठी ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ संकल्पना लागू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

स्वच्छता अभियान बनले लोकचळवळ

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सुरू असलेली स्वच्छतेची ही चळवळ फक्त महापालिका कर्मचारी,  अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न राहता ही लोकचळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचाऱ्यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वच्छता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम घेण्यात येत असून स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. यामध्ये रस्ते, नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रातील राडारोडा यांचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटर, सार्वजनिक शौचालये स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असून आतमधील  तुटलेले, फुटलेले रस्ते, फुटपाथ, खराब शौचालये तातडीने दुरुस्त करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था-संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.

खेळाडूंशी संवाद

टिळकनगर येथील मैदानावर खेळाडूंशी संवाद साधत स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. टिळकनगर मैदान येथे मुले क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनाही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. फलंदाजी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button