खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांकडून ग्रामीण कारागिरांना यंत्रे आणि संबंधित साहित्याचे वाटप


नवी दिल्ली 24 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘मोदींची हमी’वाल्या ‘नव्या भारताच्या नव्या खादी’ने ‘आत्मनिर्भर भारत अभियानाला’ नवी दिशा दिली आहे. गेल्या 9 वर्षात खादी उत्पादनांच्या विक्रीत चौपटीपेक्षा जास्त विक्रीने ग्रामीण भारतातील कारागिरांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध केले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे (एमएसएमई), अध्यक्ष मनोज कुमार यांनी गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर येथे ग्रामोद्योग विकास योजना(जीव्हीआय) अंतर्गत आयोजित यंत्रे आणि संबंधित सामग्री संचाच्या वितरण कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी)च्या अंतर्गत आयोजित मार्जिन मनी अनुदान वितरण कार्यक्रमात ही माहिती दिली. या वितरण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या लाभार्थ्यांना 180 विद्युत चाके , 100 मधुमक्षिका पालन पेट्या, 20 स्वयंचलित अगरबत्ती यंत्रे, 20 पेडल चालित अगरबत्ती यंत्रे आणि 20 दोना मेकिंग यंत्रे वितरित करण्यात आली. तर केव्हीआयसीच्या पश्चिम विभागात समावेश असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित दादरा आणि नगर हवेलीसाठी 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्जिन मनी अनुदान (तफावत निधी अनुदान) जारी करण्यात आले. याच्या माध्यमातून पश्चिम विभागात 226 नव्या उद्योग एककांची स्थापना होईल ज्यामुळे येथील 2,486 बेरोजगारांना रोजगार मिळतील.
वितरण कार्यक्रमाला संबोधित करताना मनोज कुमार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’मंत्राने खादी ला जागतिक मंचावर ओळख दिली आहे. गेल्या 9 वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची उलाढाल 1.34 लाख कोटी रुपयांच्या पलीकडे पोहोचली आहे. तर या काळात 9.50 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत, केव्हीआयसी ने आतापर्यंत 27 हजारांहून अधिक कुंभार बंधू-भगिनींना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप केले आहे, ज्यामुळे 1 लाखांहून अधिक कुंभारांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडले आहे. या योजनेंतर्गत 6000 हून अधिक टूलकिट्स (अवजारे संच) आणि यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले आहे, तर मध अभियान योजनेंतर्गत आतापर्यंत 20,000 लाभार्थ्यांना 2 लाखांहून अधिक मधमाशी पालन पेट्या आणि मधमाश्या कॉलनीचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, सध्या देशभरात 3000 हून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत, ज्याद्वारे 5 लाखांहून अधिक खादी कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील 31 खादी संस्थांच्या माध्यमातून 1400 हून अधिक कारागिरांना रोजगार मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात येथील 60 खादी विक्री केंद्रांवर 26 कोटी रुपयांहून अधिक खादीची विक्री झाली.
केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार पुढे म्हणाले की, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या (पीएमईजीपी) माध्यमातून केव्हीआयसी, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. ते म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत पीएमईजीपीच्या माध्यमातून महाराष्ट्रात 26,375 नवीन एककांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यासाठी भारत सरकारने सुमारे 802.51 कोटी रुपयांचे मार्जिन मनी सबसिडी जारी केले आहे. या नवीन एककांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 2,11,000 नवीन रोजगाराची निर्मिती झाली आहे. वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि केव्हीआयसी चे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.
N.Chitale/S.Patil/R.Agashe/P.Malandkar