महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील 196 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित- मंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील 196 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतचे आदेश निर्गमित– मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि. 15 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 21 उमेदवार वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 मधील सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी एक, सहाय्यक अभियंता श्रेणी दोन या पदावर शिफारस केलेल्या ईडब्लूएस प्रवर्गातील 21 उमेदवारांना वगळून उर्वरित 196 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत जलसंपदा विभागाने 17 नोव्हेंबर 2023 व सार्वजनिक बांधकाम विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी आदेश निर्गमित केले आहे. याप्रकरणी याचिका न्यायप्रविष्ठ असल्याने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्तीबाबत प्रतीक्षा करणे उचित होईल असे विधी व न्याय विभागाने अभिप्राय दिले आहेत. 21 ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या नोकरीला बाधा येणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.