सोशल मीडिया हे प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा – कु. आदिती तटकरे
सोशल मीडिया हे प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा – कु. आदिती तटकरे
सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमे आली आहेत. सोशल मीडिया हा प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञांकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोगामार्फत महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांसंदर्भात सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे प्राप्त होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन श्री. गादिया यांनी केले.
००००