आयएनएस सुमेधा केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल
11 DEC 2023 : PIB Mumbai
आफ्रिकेत केल्या जात असलेल्या लांब पल्ल्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून, भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ 09 डिसेंबर 2023 रोजी केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल झाले. केनियातील अलीकडे विकसित करण्यात आलेल्या बंदरावर भारतीय नौदलाच्या कोणत्याही जहाजाने दिलेली ही पहिलीच भेट आहे.
या बंदर भेटी दरम्यान, दोन्ही नौदलांचे कर्मचारी परस्पर सहकार्य वाढवण्याच्या आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक संवाद, डेक भेटी आणि क्रीडा स्पर्धा द्वारे देवाणघेवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या भेटीचा भाग म्हणून एक संयुक्त योग सत्र, डेकवरील मेजवानी, वैद्यकीय शिबिर आणि सागरी भागीदारी व्यायामाचे नियोजन देखील आयोजित करण्यात आले आहे.
आयएनएस सुमेधा ही भारतीय नौदलाच्या स्वदेशात विकसित सरयू श्रेणीतील तिसरे जहाज आहे. 07 मार्च 2014 रोजी राष्ट्रार्पण झालेल्या या जहाजाला स्वतंत्रपणे आणि सामुहिक कार्यांच्या समर्थनार्थ विविध भूमिकांमध्ये तैनात करण्यात आले आहे. हे जहाज शस्त्रे आणि सेन्सर्सच्या रचनेने सुसज्ज आहे, तसेच हे जहाज अनेक भूमिका निभावणारे हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. हे जहाज विशाखापट्टणम येथे स्थित भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटचा एक भाग आहे आणि पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या ऑपरेशनल कमांड अंतर्गत कार्य करते.
भारतीय नौदलाच्या ‘मैत्रीचे पूल’ बांधण्याच्या आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची जहाजे नियमितपणे परदेशात तैनात केली जातात. ही भेट ‘क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ (SAGAR) या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे आणि भारत-आफ्रिकेतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करते.
***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor