भारतात हवाई प्रवास ही आता केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

भारतात हवाई प्रवास ही आता केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही – केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

19 NOV 2023 3:00PM by PIB Mumbai : भारतात हवाई प्रवास ही आता केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केले.

एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (AeSI) या संस्थेने गौरवशाली 75 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उडान (उडे देश का आम नागरिक), विमानतळांची संख्या दुप्पट करणे, परवडणारे विमान भाडे अशा उपक्रमांच्या माध्यमातून विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठीही प्रवासाचे साधन बनवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. विमानतळांवर आता “हवाई” चप्पल घालणारे लोक “हवाई-जहाज” (विमान) मध्ये चढताना पाहणे हे नेहमीचे दृश्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

हवाई आणि अंतराळ क्षेत्रांबाबत चर्चा करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की 2025 साली भारताच्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी गगनयान मोहीमेनंतर, 2030 साली एक भारतीय चंद्रावर उतरेल आणि 2035 सालापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ केंद्र असेल.

आपण भविष्याकडे पाहत असताना, भारत एरोस्पेस तंत्रज्ञानात आणखीन उंच शिखरे गाठण्यासाठी तयार आहे, कारण सरकार वैज्ञानिक समुदायाला निरंतर आणि स्थीर पाठिंबा देत आहे; तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक स्रोत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. “मेक इन इंडिया” उपक्रमाने आपल्या एरोस्पेस परिक्षेत्रात बदल घडवण्यास तसेच स्वदेशी उत्पादने आणि नवोन्मेष वाढवण्यास सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय एरोस्पेस क्षेत्र लक्षणीयरीत्या विकसित झाले आहे आणि आपण अभूतपूर्व यशाच्या शिखरावर आहोत, हे डॉ जितेंद्र सिंग यांनी निदर्शनास आणून दिले. यशस्वी चांद्रयान-3, मार्स ऑर्बिटर मिशन, आदित्य एल1 आणि ISRO ची गगनयान मोहीम, स्वदेशात विकसित हलके लढाऊ विमान तेजस, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे विकसित अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, सार्वजनिक क्षेत्रातील इतर संबंधित तंत्रज्ञान/ खाजगी उद्योग आणि स्टार्टअप्स तसेच आपले शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी जागतिक स्तरावर भारताचे सामर्थ्य दाखवून दिले आहे, असे डॉ. सिंह यांनी नमूद केले.

“एरोस्पेस आणि एव्हिएशन 2047” या विषयावरील ही आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन हे ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्यासाठी आमच्या समर्पणाचा पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाच्या समारोपात, डॉ जितेंद्र सिंह यांनी परिषदेच्या यशासाठी तसेच एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या निरंतर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button