लाभार्थ्यांची अलोट गर्दी…

लाभार्थ्यांची अलोट गर्दी…

यवतमाळ, दि. 30 : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. प्रशासनाने 35 हजार लाभार्थ्यांच्या उपस्थितीचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात 50 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी व सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती. प्रशासनाची उत्तम तयारी आणि लाभार्थ्यांच्या ‘अलोट गर्दी’ने खऱ्या अर्थाने ‘शासन आपल्या दारी’ आल्याचा अनुभव या कार्यक्रमात आला.

सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत आणि पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दि.1 एप्रिलपासून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या कालावधीत 16 लाख 21 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभाची रक्कम 601 कोटी रुपये एवढी आहे.

राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाभ वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यवतमाळ येथे आज झालेला 17 वा कार्यक्रम ‘रेकॅार्ड ब्रेक’ ठरला. कार्यक्रमाला 50 हजारांपेक्षा जास्त लाभार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसात शासनाने आपल्यासाठी काहीतरी केल्याची भावना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

कार्यक्रमाला शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगारांसह समाजातील सर्वच घटक तसेच शासनाच्या विविध योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाभार्थ्यांना सुखकरपणे कार्यक्रमस्थळी पोहोचता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 498 बसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवास सुरु करताना लाभार्थ्यांना अल्पोपहार व पाणी, तर कार्यक्रम संपल्यानंतर बसमध्ये भोजन देण्यात आले. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली.

लाभार्थी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांना काहीतरी मिळाले पाहिजे, यादृष्टीने विविध शासकीय विभागांचे 55 दालने लावण्यात आली होती. येथे विविध शासकीय विभागांनी आपल्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती दिली. आलेल्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. त्याचा असंख्य लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणी, समस्या, तक्रारी असतात. त्याची शासनस्तरावर दखल घेतली जावी, असे त्यांना वाटत असते. यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु करण्यात आले. कार्यक्रमस्थळी देखील अशा तक्रारींची दखल घेण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे स्वतंत्र दालन लावण्यात आली होती. त्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची चार स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी कार्यक्रमस्थळी रोजगार मेळावा घेण्यात आला. त्याला देखील युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने रिक्त 1 हजार 500 पदांसाठी युवकांच्या मुलाखती घेतल्या.

प्रशासनाने प्रशस्त सभामंडप कार्यक्रमस्थळी तयार केला होता. आलेल्या कोणत्याही लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना बसता यावे यासाठी नियोजनाप्रमाणे 35 हजार खुर्च्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बॅाटल व ओआरएसचे पाकीट ठेवण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय व आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

जिल्हाभरातून येणाऱ्या शासकीय व खासगी बस, लहान वाहनांच्या पार्किंगचे उत्तम नियोजन झाल्याने कुठेही गैरसोय झाली नाही. वाहनाच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ करण्यात आल्याने वाहने, लाभार्थी व वाहनचालकांची सुविधा झाली. वाहनांचा कुठेही अधिकवेळ थांबावे लागले नाही.

विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक सरपंचास फेटे बांधण्यात आल्याने हे फेटेधारी सरपंच लक्षवेधक ठरले.

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक कलावंत गजानन वानखडे व त्यांच्या संचाने पोवाडे, मराठी गीते, मनोरंजनातून जनजागृतीचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना कार्यक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री संजय राठोड यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यासोबतच प्रत्येक लाभार्थ्यास वेगवेगळ्या फळांचे रोपटे देखील देण्यात आले.

Related Articles

Back to top button