व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत
व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे : 31/10/2023: आमचे सरकार शंभर टक्के उद्योजक आणि व्यापारी बंधूसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच त्यांची मुंबईत आवश्यक त्या सर्व खात्याचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, कोणताही घटक नाराज होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्रातून कोणताही उद्योग बाहेर गेलेले नाही. ऊलट हजारो कोटींची परदेशी गुंतवणूक उद्योगात आणली. डायमंड ज्वेलरी पार्कसाठी मुंबईतच २५ एकर जागा दिली आहे. केवळ उद्योग क्षेत्राला बदनाम करण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचाही त्यांना टोला लगाविला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड `मायटेक्स एक्स्पो` या भव्य प्रदर्शनाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन उद्योजकांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचे मायटेक्सचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत आहे. महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या अविरत प्रयत्नामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. महसूल वाढीचा टक्काही वाढल्याने राज्यात उदयोग, व्यवसायांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. मात्र काही जण राजकारणापेक्षा राज्यांची बदनामी करत आहेत. आमच्या सरकारने उद्योग, व्यवसायासाठी काही तत्काळ निर्णय घेतले आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ मध्ये तत्कालीन उद्योमंत्र्याच्या काळात यवतमाळ येथील जागा मिळविण्यासाठी उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तत्कालीन सरकारच्या कार्यपध्दतीमुळेच अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आमच्या सरकारने कधीही उद्योजकांना अँटीचेंबर आणि नेत्यासोबत बैठकीसाठी प्रवृत्त केले नाही. त्यामुळेच उद्योगांचे अनेक प्रश्न आमच्या सरकारकडून मार्गी लागले आहेत आणि उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. कोणालाही न भेटता ७५०० हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यात वर्ग केला आहे. तसेच प्रकल्प उभारताना त्या गावातील स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेमी कंडक्टरचा प्रकल्प उभारण्यासाठी आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप पुढाकार घेत आहे. त्यांच्या उद्योगालाही पाठबळ दिले जाईल.
विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी उद्योग विस्ताराला चालना देण्यासाठी त्यांची धडपड असते. उद्योग विभागाच्या समस्यांबाबत डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात यावी, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांसोबत परिषद ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला त्यांना आलेले अनुभव मांडतील. प्रकल्प जातो तेव्हा त्याची जेवढी प्रसिद्धी होते तेवढी तो प्रकल्प येताना झाल्याचे दिसत नाही. तसेच येत्या ३० आँक्टोबरला व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. आँनलाइन व्यापाराच्या आव्हांनाला तोंड देण्यासाठी सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येईल.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे तत्काळ निर्णय घेणारे मंत्री असल्याने उद्योग क्षेत्राला मोठे चैतन्य आले आहे. व्यापार्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या माध्यमातूनच मायटेक्सची संकल्पना रूजली. व्यापार आणि उद्योगांच्या प्रश्नी सरकार दरबारी संयुक्त बैठक घ्यावी.
दरम्यान उद्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले. मान्यवरांच्या हस्ते आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता, महाराष्ट्र चेंबरचे सेक्रेटरी जनरल सागर नागरे, एक्स्पो इंडियाचे जावेद शेख आदींचा सत्कार झाला. डाँ. विजयकुमार मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. डाँ. गोविंद पानसरे यांनी आभार मानले.
००
फोटो ओळी-
१) मायटेक्स एक्स्पोमध्ये थेट उद्योगमंत्र्याशी संवाद कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी उपस्थितात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया.
२) दुसया छायाचित्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थितात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया, जावेद शेख, सागर नागरे.