लोककला अभ्यासक सदानंद राणे यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार
लोककला अभ्यासक सदानंद राणे यांना राज्य शासनाचा सांस्कृतिक कला गौरव पुरस्कार
सिंधुदुर्ग (तळेरे), दि. 16 : निकेत पावसकर : जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ओझरम गावचे सुपुत्र लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य नाट्य दिग्दर्शक सदानंद राणे यांना महाराष्ट्र शासनाचा नृत्य विभागाचा “राज्य सांस्कृतिक पुरस्कार-2023” जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे कला क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. हा पुरस्कार जिल्ह्यासाठीही भूषणावह आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये सदानंद राणे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदानंद राणे यांनी गेल्या 53 वर्षात कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1970 ते 1981 राष्ट्र सेवादल कला पथक निर्मित महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, आजादी की जंग, शिव दर्शन या कार्यक्रमातून नाट्य, नृत्य कलाकार म्हणून भाग घेऊन संपूर्ण भारत दौरा केला. त्यासाठी कवी प्रा. वसंत बापट, लोकशाहीर लीलाधर हेगडे, नृत्य दिग्दर्शिका सुधाताई वर्दे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदानंद राणे यांनी सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरील जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली पारंपारिक लोक नृत्य स्पर्धा धिना धिन धा या स्पर्धेचे अनेक वर्षे सन्माननीय परीक्षक म्हणून काम पाहिले.
कामगार वस्तीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील निरनिराळ्या वयोगटातील मुला मुलींना अग्रक्रमाने प्राधान्य देऊन नृत्य, नाट्य, संगीत यांचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रंगमंच मिळवून देण्यासाठी 1985 साली सांस्कृतिक चळवळ जपणारी पदन्यास संस्थेची स्थापना केली. त्यामाध्यमातून राज्यभर अनेक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. विविध ठिकाणी गेली 35 वर्षे संगीत, नृत्याचे ते कार्यशाळा घेतात. विविध कला महोत्सवात त्यांनी आपल्या कलेने वेगळी ओळख निर्माण केली.
सदानंद राणे यांची लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य, नाट्य दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांना यावर्षी सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार, आनंद दिघे संस्था, खासदार राजन विचारे, नवरत्न पुरस्कार ठाणे, झपूझा संस्था विरार, कार्य भुषण पुरस्कार, वारसा सांस्कृतिकचा ठाणे अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.