चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर, दि. 12 : मुंबईतील चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणासंबंधी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल तत्काळ मागविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भात सदस्य आमदार अबू आजमी, प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
१३ ऑक्टोबर रोजी आणिकगाव मनपा हिंदी शाळेमधील माध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर १६ विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकारामुळे संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कामकाज काढून घेण्यात आले आहे. तसेच त्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला नसल्यामुळे अंतिम कारवाई झालेली नव्हती. त्या शाळेतील १८९ विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होते आणि ५१ इतर मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होते, त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. हा त्रास कशामुळे झाला हे तपासण्यासाठी फॉरेन्सिकची मदत घेण्यात आली होती. त्याचा अहवाल मागवण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. फडणवीस यांनी सभागृहात दिली.