ऊर्दू लर्निंग सेंटर प्रकरणी नियमबाह्य काम आढळून आल्यास कारवाई करणार – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. 21 : बृहन्मुंबई येथील ऊर्दू लर्निंग सेंटरचे काम ४३ टक्के पूर्ण झाले असून याप्रकरणी काहीही नियमबाह्य आढळून आले असेल, तर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य मिहीर कोटेचा यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.सामंत म्हणाले की, याठिकाणी आयटीआय आवश्यक आहे. त्यासाठी वेगळा आराखडा तयार करण्यात येईल. ही जागा पूर्वी आयटीआयसाठी देण्यात आली होती. मात्र त्याचा वापर झाला नसल्याने ही जागा पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतला. मात्र याविषयी सर्व लोकप्रतिनिधींच्या भावना विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना दिलेल्या भूखंडाचा ठराव रद्द करुन त्यावर ऊर्दू भवन बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका प्रलंबित आहे. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ११ ऑगस्ट २०२३ रोजीच्या बैठकीतील सूचनेनुसार ऊर्दू भाषा लर्निंग सेंटरचे काम ५ सप्टेंबर २०२३ पासून थांबविण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी सदस्य रईस शेख, नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.