‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉलमधील दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्यात, व्यवस्थापकास मनसे निवेदन


वांद्रे कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ या पंचतारांकित मॉलमधील विविध आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत का; हे तपासून बघण्यासाठी आज महाराष्ट्र सैनिकांनी या मॉलचा पाहणी दौरा केला. मॉलमधील निम्म्या दुकानांच्या पाट्या मराठीत होत्या, तर निम्म्या दुकानांच्या पाट्या फक्त इंग्रजीत होत्या. म्हणून, दोन दिवसांच्या आत सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्यात ही मागणी ‘जिओ वर्ल्ड’चे व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर, प्रॉपर्टी) श्री. विवेक जोशी यांच्याकडे मनसेचे अखिल चित्रे व महाराष्ट्र सैनिक यांनी केली.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, मॉलच्या मुख्य इमारतीवर आणि आतमध्येही अनेक ठिकाणी ‘Jio World Plaza’ असं फक्त इंग्रजीतच लिहिलेलं आहे. इंग्रजी नावासोबत मराठी भाषेत ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ लिहावंच लागेल, अशी समज श्री. जोशी यांना दिली. याबाबत दोन दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
अदाणी असो की अंबानी की सामान्य दुकानदार; महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लागायलाच हव्यात. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांना ‘कडक समज’ दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक स्वस्थ बसणार नाहीत. असा पवित्रा मनसेचे अखिल चित्रे व महाराष्ट्र सैनिक यांनी घेतला.