चित्रपटांचा वार्षिक महोत्सव – सर्वोत्तम जागतिक आणि भारतीय चित्रपटांची पर्वणी देणाऱ्या इफ्फीला 20 नोव्हेंबरपासून होत आहे प्रारंभ
चित्रपटांचा वार्षिक महोत्सव – सर्वोत्तम जागतिक आणि भारतीय चित्रपटांची पर्वणी देणाऱ्या इफ्फीला 20 नोव्हेंबरपासून होत आहे प्रारंभ
हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस 54 व्या इफ्फीमध्ये सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी राहणार उपस्थित
19 NOV 2023 5:50PM by PIB Mumbai : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या 14 आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक फीचर फिल्म महोत्सवांपैकी एक असून जागतिक पातळीवर चित्रपट महोत्सवांची नियामक संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते संघटनेच्या महासंघाकडून(FIAPF) अधिस्वीकृती मिळालेला महोत्सव आहे. कान, बर्लिन आणि व्हेनिस यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे अशाच प्रकारचे नामवंत महोत्सव असून या श्रेणी अंतर्गत त्यांना देखील एफआयएपीएफकडून अधिस्वीकृती आहे. अनेक वर्षांपासून सर्वोत्तम जागतिक आणि भारतीय चित्रपटांचा आनंद देणारी ही वार्षिक सिनेपर्वणी असून भारतातील तसेच जगभरातील दिग्गज या महोत्सवाला प्रतिनिधी, अतिथी आणि वक्ते म्हणून उपस्थित राहात आहेत, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट विभागाचे संयुक्त सचिव प्रिथुल कुमार यांनी सांगितले. या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यासाठी गोव्यामध्ये पणजी येथे आयोजित वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. यावेळी ईएसजी च्या उपाध्यक्ष डेलिला लोबो, ईसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा, पीआयबी – पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि पीआयबीच्या महासंचालक प्रग्या पालिवाल गौर या देखील उपस्थित होत्या.
यावर्षीच्या महोत्सवाविषयी सविस्तर माहिती देताना प्रिथुल कुमार म्हणाले, “ जागतिक चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार(SRLTA) हे इफ्फीच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जागतिक चित्रपट क्षेत्रात सर्वात महान व्यक्तिमत्वांपैकी एक असलेले हॉलिवुड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, त्यांची पत्नी आणि नामवंत अभिनेत्री कॅथरिन झिटा जोन्स यांच्यासोबत इफ्फीमध्ये उपस्थित असतील. ”
या महोत्सवामध्ये आयनॉक्स पणजी, मॅक्विनेज पॅलेस, आयनॉक्स पर्वरी आणि झेड स्क्वेअर सम्राट अशोक या चार ठिकाणी 270 पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. 54व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट असतील. गेल्या वेळच्या म्हणजे 53व्या इफ्फीपेक्षा यंदाच्या महोत्सवातील चित्रपटांची संख्या 18 ने जास्त आहे. यामध्ये 13 वर्ल्ड प्रिमिअर, 18 आंतरराष्ट्रीय प्रिमिअर, 62 आशिया प्रिमिअर आणि 89 भारत प्रिमिअर असतील. यंदाच्या इफ्फीसाठी 105 देशांमधून विक्रमी 2926 प्रवेशिका आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांच्या तिप्पट आहे. इंडियन पॅनोरमा विभागात भारतातील 25 फीचर फिल्म आणि 20 बिगर फीचर फिल्म्स दाखवल्या जातील. आत्तम हा मल्याळी चित्रपट फीचर विभागातील उद्घाटनाचा चित्रपट असेल आणि बिगर फीचर विभागात मणिपूरचा ऍन्ड्रो ड्रीम्स हा चित्रपट असेल.
या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट वेब मालिका (OTT) पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यासाठी 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 10 भाषांमधल्या 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत, असे 54 व्या इफ्फीमधील नवीन उपक्रमांबद्दल बोलताना प्रितुल कुमार यांनी सांगितले. विजेत्या मालिकेला प्रमाणपत्रे आणि 10 लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल. या पुरस्काराची घोषणा समारोप समारंभात केली जाईल, अशी माहिती प्रितुल कुमार यांनी दिली.
जगभरातील आकर्षक माहितीपटांचे संकलन असणारा एक डॉक्यु-मोन्ताज विभाग देखील यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. माहितीपट क्षेत्रात भारताचा ऑस्कर प्रवेश आणि आजच्या काळात चित्रपट निर्मितीमध्ये माहितीपटांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या विभागाचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) अंतर्गत एनएफडीसी आणि एनएफएआय’ने भारतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून जागतिक दर्जाचे पुनर्संचयन केलेल्या 7 जागतिक प्रीमियरचा पुनर्संचयित क्लासिक्स विभाग देखील सादर केला जाणार आहे. या विभागात 3 आंतरराष्ट्रीय पुनर्संचयित चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील.
प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांसोबत 20 पेक्षा जास्त ‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन कन्व्हर्सेशन’ सत्र असणारा इफ्फी महोत्सव या वर्षी चाहत्यांसाठी एक रोमांचक पर्वणी सादर करणारा ठरणार आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या गाला प्रिमियर या उपक्रमात या वर्षी 12 गाला प्रिमियर आणि 2 विशेष वेब सिरीज प्रिमियर सादर होणार आहेत. इफ्फीमधील या चित्रपट प्रीमियरमध्ये त्यातील कलाकार आणि प्रतिभावंत आपापल्या चित्रपटांच्या जाहिरातीसाठी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरतील.
एनएफडीसी फिल्म बाजाराच्या 17 व्या आवृत्तीत VFX आणि टेक पॅव्हेलियन, माहितीपट तसेच नॉन-फीचर प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांचा परिचय, “नॉलेज सिरीज” आणि ‘बुक टू बॉक्स ऑफिस’ यांचाही समावेश असेल. एकूणच, 300 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प या वर्षी निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी फिल्म बाजारच्या 17 व्या आवृत्तीत प्रदर्शित केले जातील.
इफ्फीच्या 54 व्या आवृत्तीत या वर्षी 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी) उमेदवारांसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ञांनी रचना केलेले व्यावसायिक वर्ग देखील घेतले जातील. त्याचबरोबर 20 पेक्षा जास्त आघाडीच्या कंपन्यांमार्फत “टॅलेंट कॅम्प” सुद्धा आयोजित केले जातील.
या चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित राहणाऱ्या विशेष दिव्यांग प्रतिनिधींना सर्व चित्रपट पाहता यावेत आणि महोत्सवाच्या इतर ठिकाणी प्रवेश करता येईल याची खातरजमा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातील. हा उत्सव म्हणजे सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ असावा, यासाठी उचललेले पाऊल ठरेल.
इफ्फीमध्ये सहभागी होणारे आणि इफ्फीसाठी नोंदणी न केलेले स्थानिक आणि पर्यटक अशा अनेकांना देखील चित्रपट, कला, संस्कृती, हस्तकला यांचा आनंद घेण्याबरोबरच येथील विविध उपक्रमांचा देखील आनंद घेता येईल. या महोत्सवात भारत सरकारच्या केंद्रीय संचार विभाग तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार असून त्यामार्फत चित्रपट रसिकांना संवादात्मक प्रदर्शनाद्वारे चित्रपटांबद्दल अधिक जाणून देण्याची संधी मिळेल. या ठिकाणी सर्वांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल. कारवाँ, शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, IFFI मर्चंडाईज आणि इतर उपक्रमांसह महोत्सवाच्या तीन ठिकाणी जनतेसाठी चित्रपटांचे खुले प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल.
या पत्रकार परिषदेत, पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी यांनी प्रसिद्धी माध्यमांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. इफ्फीच्या या आवृत्तीसाठी पत्र सूचना कार्यालयाने हाती घेतलेल्या विविध अभिनव उपक्रमांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. यामध्ये प्रसार माध्यमांसाठी चित्रपट समीक्षा कार्यशाळा आणि पत्र सूचना कार्यालयातर्फे इफ्फीच्या सर्व प्रसिद्धीपत्रकांसाठी कोकणी अनुवाद सुविधा पुरवणे अशा बाबींचा समावेश आहे.