मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ


मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर जिल्हा जळगांव येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी कलानंद बालमेळावा संपन्न होत आहे. या संमेलनातील बालमेळाव्यात बालनाट्य, काव्य वाचन, नाट्यछटा, नाट्य प्रवेश, समूहगीत, कथाकथन, सादरीकरण करण्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बालमेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी आपले कला गुण सादर करु शकतात. काव्य वाचनासाठी स्वलिखीत कवितांचे सादरीकरण करण्यासाठी २० डिसेंबरला निवड चाचणी होईल. बालमेळावा उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतातील गायनाची निवड चाचणी २६ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होईल व त्यातूनच निवडक मुलांना बाल मिळाव्यात समूहगीतात खरा तो एकची धर्म व बालसागर भारत हो या गाण्यांवर समुहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. नाट्यछटा सादरीकरण २७ डिसेंबरला सकाळी दहा वाजता होईल. सर्व निवड चाचण्या साने गुरुजी हायस्कूल एस.एम. गोरे सभागृह अमळनेर येथे होणार आहेत.
ज्यांना कलानंद बालमेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावीत त्यांची कार्यशाळा घेतली जाईल व त्या कार्यशाळातून निवड करून कलानंद बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात येतील. कलानंद बालमेळावा साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२३ आहे त्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर जिल्हा जळगाव येथे पाठवावे, असे आवाहन, आयोजकांकडून करण्यात आले आहे.
चिमुकल्यांच्या हस्तेच बालमेळाव्याचे उद्घाटन
कलानंद बालमेळाव्याला उद्घाटक म्हणून मुलगा, मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. कलानंद बाल मेळाव्याचे उद्घाटक मुलगा, मुलगी यांची निवड करण्यासाठी ज्या मुलामुलींचे कविता कथा आणि इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला नामवंतांनी गौरविण्यात असेल अथवा एखाद्या साहित्यिक पुरस्कार मिळाला असेल असे इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे २० डिसेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे (मो.९४२२२७९७१०), भैय्यासाहेब मगर (मो.९४२३९०४४८३), वसुंधरा लांडगे (मो.९६८९०३७८४१), स्नेहा एकतारे (मो.९४२३९०२९६५) यांच्याशी संपर्क साधावा.
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्या/व्हिडीओ मिळवण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा : https://forms.gle/