नाव मोठे आणि काम खोटे म्हणजे पार्ले बिस्कीट कंपनी, मनसे कायदेशीर लढा सुरू राहणार – केतन नाईक
नाव मोठे आणि काम खोटे म्हणजे पार्ले बिस्कीट कंपनी.
पार्ले बिस्कीट आणि आपले देशवासीय हे अतूट नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या या ब्रँडने १९३९ ला बिस्कीट उत्पादनाल सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या पश्चिम उपनगरातून तयार होणाऱ्या या ब्रॅंडचे आत्ता देशभरात स्वतःचे सुमारे ५ आणि जॉब वर्क प्लांट म्हणजेच इतर कंपन्यांकडून उत्पादन करणारे सुमारे १२० कारखाने आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे पाच प्लांट आहेत. या कारखान्यांमध्ये तयार होणारे पार्ले प्रोडक्ट्स नीट तयार होतात की नाही हे पाहायला पार्ले व्यवस्थापन तत्पर असते व वेळोवेळी आवश्यक बदल करुन घेत असते. परंतु विविध मालकांकडून चालविल्या जाणाऱ्या या कारखान्यांमधील कामगारांना सोयी – सुविधा किंवा किमान वेतन तरी मिळते आहे की नाही, आपल्या ब्रॅंडसाठी अप्रत्यक्षरित्या काम करणाऱ्या कामगारांच्या राहणीमानत काही सुधारणा होतेय की नाही याने पार्लेला काहीही फरक पडत नाही.
आता आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिवांगी बेकर्स या पार्लेकरिता उत्पादन करणाऱ्या कंपनीचे उदाहरण घ्या. इथे काम करणाऱ्या सुमारे पाचशे कामगारांना साधे किमान वेतन दिले जात नाही. ही कंपनी चालवणारे जे कोण मालक आहेत, सुमारे दहा डायरेक्टर्स मिळून हा उद्योग करतात त्यांना किमान वेतनाच्या व्याख्याच कळत नाहीत. अनेक वर्ष कामगार घराच्या जवळचा रोजगार आहे म्हणून इथे राबत आहेत. मुलांच्या शिक्षणाचे आणि वैद्यकीय खर्च भागवता येतील इतके देखील वेतन यांना दिले जात नाही. आजूबाजूच्या असणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील हीच परिस्थिती. पार्लेच्या माध्यमातून देशभरात चालवत असलेल्या सर्व कारखान्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे कामगार कायद्यांची पायमल्ली केली जातेच. कुठेतरी १२ तासाची शिफ्ट आणि वेतन ८ तासांच्या शिफ्ट पेक्षाही कमी, तर कुठे काम नाही असे सांगून गेटवर आलेल्या कामगारांना परत पाठवण्यात येते. पार्ले कंपनीचे वर्षातून चार वेळा या जॉब वर्क करणाऱ्या कारखान्याच्या मालकांसोबत सेमिनार घेतले जातात, या सेमिनारमध्ये पार्लेला या कारखान्यांकडून काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला जातो. परंतु या फोरममध्ये कारखान्याच्या मालकांना काय अडचणी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत याच्याबद्दल कुठलेही भाष्य करू दिले जात नाही. जर एखाद्या कारखान्याच्या मालकाने काहीतरी मांडायचे म्हटले तर त्याला “हे आपण नंतर खाजगीत बोलू” असे बजावून गप्प करण्यात येते.
पार्ले कंपनी आपल्या सर्वांना परिचित आहे. पार्लेचा प्रवास दैदीप्यमान असून जगातील सर्वात जास्त खप असलेला बिस्किट ब्रांड म्हणून आज पार्लेची ओळख आहे. वेळोवेळी त्यांच्या मनासारखे निर्णय घेऊन पार्लेने आपले एखादे प्रॉडक्ट एखाद्या ब्रँडला विकले,एखाद्याचे विकत घेतले असे अनेक व्यवहार केले आहेत परंतु ज्या कामगारांच्या श्रमावर ही कंपनी इतकी मोठी झाली असून आज कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू आहे त्या कामगारांकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. किमान वेतन व इतर तत्सम सुविधा कामगारांना दिल्या जात नाहीत. त्यात बुलढाणा येथील कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी देखील उदासीन. शिवांगी बेकर्स मधील कामगारांना त्यांच्या हक्कासाठी लढत असताना साधे कामगार प्रतिनिधी म्हणून कायद्याच्या चौकटीतून निवडून येण्याकरता दोन वर्षांचा कालावधी लागला. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडून या आस्थापनेविरोधात किमान वेतनाचा फरक व तत्सम खटले कामगार आयुक्त कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांमध्ये देखील अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. एकंदर काय तर शासनाचेही दुर्लक्ष, कारखाना मालकांचेही दुर्लक्ष आणि आणि पार्लेचही दुर्लक्ष. इतरत्र रोजगार मिळत नाही म्हणून कमी पगारात राबणाऱ्या या कामगारांची आणखी किती पिळवणूक केली जाणार आहे याचे उत्तर आता पार्लेनेच द्यायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन असलेल्या ठिकाणी कायदेशीर लढा सुरू आहे व अंतिम ध्येय गाठेपर्यंत सुरूच राहील परंतु पार्ले व्यवस्थापनाचे डोळे कधी उघडणार आता हे पाहायचे आहे.
-केतन नाईक,उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
#RajThackeray #AmitThackeray #ketannaik #parleG #workers #minimumwages #mns