दोन महिन्याच्या आत राज्यातील बसस्थानकांचे सुशोभीकरण करणार – मंत्री दादाजी भुसे
नागपूर, दि. 21 : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे २५१ बसआगार, ५७७ बस स्थानके आहेत. महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्वमालकीच्या १५ हजार ७९५ बसेस आहेत. या बसेस मधून दररोज ५४ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या बस स्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व पायाभूत सुविधांचा विकास करून रूपडे पालटविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
राज्यातील बसस्थानकांच्या दुरुस्तीबाबत सदस्य लहू कानडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान सदस्य प्रकाश आबिटकर, मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील या १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार आहे. तसेच बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यात १८६ बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. आतापर्यंत ११ निविदा काढण्यात आल्या असून दोन कामांना विकासकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ४० निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. बीओटी तत्त्वावरील कामांना प्रतिसाद कमी आहे. याबाबत निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा महिनाभरात अहवाल येईल, त्यानंतर या पद्धतीतील त्रुटी दूर करण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, राज्यात ४५ बसस्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ७२ बस स्थानकांचा विभागाच्या निधीतून विकास करण्यात येत आहे. यामध्ये ७० कामे प्रगतीपथावर आहेत. या वर्षात या कामांसाठी ४०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ९७ बस स्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभाग, आपलं गाव – आपलं बस स्थानक या संकल्पनांतूनही बस स्थानके सुशोभित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बस स्थानकांच्या कामांची तांत्रिक तपासणी करण्यात येवून यामध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.