बोट नसलेल्या व्यक्तीची आधारसाठी नोंदणी


बोट नसलेल्या व्यक्तीची आधारसाठी नोंदणी
PIB Mumbai : Bharat Satya : 11 DEC 2023 : केरळमधील एका व्यक्तीला बोटे नसल्याच्या कारणास्तव आधार नोंदणी करता आली नाही हे कळताच, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तिची नावनोंदणी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले.
याच अनुषंगाने, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या चमूने त्याच दिवशी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुमारकम येथे जोसिमोल पी जोस यांच्या घरी भेट दिली आणि त्यांचा आधार क्रमांक तयार करून घेतला. अधिकार्यांनी केलेले सहकार्य आणि मदतीबद्दल त्यांच्या आईने आभार मानले आणि आधारच्या मदतीने त्यांची मुलगी आता सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन तसेच कैवल्य या दिव्यांगांसाठीच्या पुनर्वसन योजनेसह विविध फायदे आणि सेवांचा लाभ घेऊ शकेल, असेही सांगितले.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, अपवादात्मक नावनोंदणी अंतर्गत आधार प्राधिकरण – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) दररोज सुमारे एक हजार व्यक्तींची आधार नोंदणी करते. आजपर्यंत, आधार प्राधिकरणाने बोटे नसलेल्या किंवा अन्य कारणांमुळे बोटे किंवा बुबुळ किंवा दोन्ही बायोमेट्रिक्स प्रदान करण्यात अक्षम असलेल्या सुमारे 29 लाख व्यक्तींना आधार क्रमांक जारी केले आहेत. जोसिमोलिन यांना आधी नावनोंदणी केल्यावर आधार क्रमांक का जारी केला गेला नाही, याची कारणे आधार प्राधिकरणाने तपासली तेव्हा, आधार नोंदणी ऑपरेटरने अपवादात्मक नावनोंदणी प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे असे घडल्याचे लक्षात आले.
या अनुषंगाने आधार प्राधिकरणाने नावनोंदणी निबंधक आणि संस्थांना सर्व आवश्यक पावले उचलण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. त्यात, प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती, जागरूकता आणि संवेदनशीलतेचा प्रसार करणे, सर्व आधार नोंदणी ऑपरेटरना अपवादात्मक नावनोंदणी प्रक्रियेची जाणीव करून दिली गेली आहे याची खात्री करणे, त्याचप्रमाणे त्या प्रक्रीयेचे अनुसरण करणे, अशा प्रकारची नावनोंदणी आवश्यक असलेल्या व्यक्तींना योग्य ते सहाय्य करणे याबाबत सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, या संदर्भात एक माहितीपर पोस्टर तयार करून ते आधार नोंदणी केंद्रांच्या दर्शनी भागांत लावण्यात आले आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor