‘बाईपण भारी देवा’च्या संगीतसाठी ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ ने केले संगीत दिग्दर्शक साई-पियूषचे कौतुक!

‘बाईपण भारी देवा’ चे संगीत दिग्दर्शक साई-पियूष ठरले ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’चे ‘शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023’

गेली अनेक वर्ष आपण अतिशय मेहनतीने एखादं काम करतोय आणि ते काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय, त्याला मनापासून प्रेक्षकांची दाद मिळतीये हे यश जेव्हा एखाद्याला मिळतं, तेव्हा त्या गोष्टीचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण जेव्हा ध्यानी मनी नसताना प्रतिष्ठित मॅक्झिनमध्ये केलेल्या कामाची प्रशंसा होत असते तेव्हा तो क्षण नेमका कसा असेल, हे संगीत दिग्दर्शक साई-पियूष या दोघांव्यतिरिक्त कोण जास्त चांगलं सांगू शकेल…

साई-पियूष ही संगीत दिग्दर्शकाची जोडी मराठी मनोरंजन विश्वात गेली १५ वर्षापासून कार्यरत आहे. ‘मिशन पॉसिबल’, ‘रणभूमी’ ,’ती अँड ती’, ‘आरॉन’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘ ख्वाडा’, ‘लग्न मुबारक’, ‘बाईपण भारी देवा’, ‘चौक’ यांसारख्या सिनेमांना, ‘दामोदर पंत’, ‘गेला उडत’, ‘ढॅण्टॅ ढॅण्ड’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘के दिल अभी भरा नाही’, ‘अस्तित्व’ या नाटकांना, ‘बन मस्का’, ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकांना, ‘कौन प्रविण तांबे’ या हिंदी सिनेमाला आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या हिंदी मालिकेला संगीत दिलं आहे. कलाकृतींच्या माध्यमातून साई-पियूष यांच्या कामाची चर्चा झाली, कौतुक झाले आणि त्यांच्यापर्यंत भरपूर काम येऊ लागले पण नुकताच झालेल्या विशेष कौतुकामुळे त्यांच्या या आतापर्यंतच्या करिअर ग्राफला चारचांद लागले असं म्हणूयात.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ देवा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले. या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शक साई पियूष यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली म्हणजेच यंदाच्या ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये त्यांच्या कामाची नोंद घेण्यात आली.

कळत नकळतपणे मिळालेला हा सुखद धक्का याविषयी व्यक्त होताना साई-पियूष यांनी म्हटले की, “२०२३ साली ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा आला आणि या सिनेमाने आम्हाला भरपूर यश अनुभवायला दिलं. चांगल्या गोष्टी त्या सिनेमामुळे आमच्या आयुष्यात घडल्या. गेली पंधरा वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतोय, अनेक सिनेमे गाणी हिट झाली. ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ ‘शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ 2023’ मध्ये एकंदरीत भारतीय संगीतकारांपैकी आमचं नाव तेथे होतं, जे सगळ्या रिजनल संगीतकारमध्ये फक्त आमचं नाव आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कष्ट, मेहनत आणि चांगलं काम झाल्यामुळे त्याची नोंद ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये झाली याचा आम्हाला अभिमान वाटतोय. ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये आमचं नाव येईल आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. या यशासाठी आम्ही ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मनापासून आभार मानतो.”

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडा पाव’, निखिल वैरागर दिग्दर्शित ‘आंबट शौकीन’ आणि अभ्यंघ कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या आगामी मराठी सिनेमातील गाण्यांना साई-पियूष यांनी संगीत दिले आहे. या मराठी सिनेमांमधून नवीन गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लवकरच घेता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button