“डीप क्लिन ड्राईव्ह” मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.31(जिमाका) :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या “डीप क्लीन ड्राईव्ह” या मोहिमेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मीरा भाईदर येथे केले.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील सर्वच शहरांना आवाहन केले होते. मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेप्रमाणे मीरा-भाईंदर येथील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले,त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदविला.
डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेचा उद्देश रस्ते आणि पदपथावरील धूळ कमी करणे, हा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महापालिका सफाई कामगारासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. झाडू चांगल्या प्रतीचे वापरावे, अशीही सूचना त्यांनी पालिका प्रशासनास केली. त्याचबरोबर कामगारांचे त्यांनी कौतुकही केले.
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. यानंतर दर शुक्रवारी 8 मार्च 2024 पर्यंत संपूर्ण शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉप वरील, भिंतींवरील पत्रिका आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील थुंकलेले रेड स्पॉट्स स्वच्छ करणे, ही कामे केली जातील. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हनुमान मंदिर आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी आयुक्तांचे कौतुक केले.
मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांशीही संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका समजून घेऊन स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व त्यांनी सांगितले. मीरा-भाईंदर महानगरपालिका पुढील काळात हा स्वच्छतेचा जागर कायम चालू ठेवणार असून शहरातील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहील, यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त श्री. काटकर यांनी यावेळी केले.