संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

मुंबई, दि 9:-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद

इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच  या देशाची,राज्याची  आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.

स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर 

संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याचे

कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.  मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटार,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन  शहाजी राजे विद्यालयातील  विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आमदार पराग अळवणी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली.  या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.

*******

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button