महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार – मंत्री मंगल प्रभात लोढा


मुंबई, दि. ५/१२/२०२३ : राज्य शासनाच्यावतीने मुंबई येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभारणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे दिली.
चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते.
यावेळी सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डॉ. मनोहर अंचुले, उद्योजक अनिल राऊत, राजीव जांगळे, सागर मदने, मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. स्मिता काळे, श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थानचे श्री फरांडे महाराज, पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, धनगर समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. संयोजन समितीने येत्या ३० दिवसात मुंबई शहरातील जागा सूचवावी त्याठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करण्याची कार्यवाही केली जाईल.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे सायंकाळी पाच पासूनच धनगरी ढोलांचा आवाजाने मैदान दुमदुमून गेले होते. शाहीर सुरेश सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने शौर्यगाथा महाराजा यशवंतराव होळकरांची पोवाडा सादर केला. कोकणातील धनगर समाज बांधवांनी कोकणी गज नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सागर मदने यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पुण्यलोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी प्रास्ताविक, तर रामचंद्र जांगळे यांनी आभार मानले. प्रशांत पुजारी यांनी निवेदन केले.
यावेळी संयोजन बबन कोकरे, गणपत वरक, रामचंद्र जांगळे, तुकाराम येडगे, दीपक झोरे, संतोष बावदाणे, पी. बी. कोकरे, अनंत देसाई, सुरेश वावदाणे, सूर्यकांत जांगळे, तानाजी शेळके, संतोष जांगळे, बंटी बावदाणे, नाना राजगे, अशोक पाटील, विश्वनाथ साळसकर यांनी केले.