निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला, शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर इंगळे यांची सदिच्छा भेट.

सिंधुदुर्ग (तळेरे), निकेत पावसकर : दि. 10/12/2023 :तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर इंगळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी या संग्रहामागची संकल्पना जाणून घेतली आणि या संग्रहातील अनेक संदेश पत्रांचे कौतुक करताना विविध मान्यवरांच्या आठवणी जागवल्या.

तळेरे येथील निकेत पावसकर गेली 16 वर्षे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह करीत आहेत. त्यांच्या या संग्रहात देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1700 पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा समावेश आहे. या संग्रहाचे प्रदर्शने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी झालेली आहेत.

प्रा. डॉ. सुधीर इंगळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या आगळ्यावेगळ्या अक्षरघराला भेट दिली. यावेळी त्यांनी या संग्रहातील अनेक पत्रे पहिली आणि त्यातील अनेक मान्यवरांच्या आठवणी जागृत केल्या. यावेळी डॉ. इंगळे यांनी पावसकर यांना परभणी जिल्ह्यात या संग्रहाचे प्रदर्शन आणि संवाद कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

(कोट)
यावेळी बोलताना डॉ. इंगळे म्हणाले की, या छोट्याशा घरात अवघ्या विश्वाचं अक्षर महोत्सव नांदतोय. हा काही मिनिटाचा प्रवास एक अक्षय अक्षर प्रवास होता. निकेत पावसकर हे एक स्वच्छ प्रतिमेचे पत्रकार, संग्राहक प्रतिभासंपन्न कवी आहेत.

यावेळी त्यांच्या सोबत तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे मास मीडिया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रशांत हटकर उपस्थित होते.

संग्रहातील सर्व पत्रे भारतीय पोस्ट कार्डवर (चौकट)
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी या संग्रहातील सर्व संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतलेली आहेत.

अक्षरघराला यांनी दिली भेट (चौकट)
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी यांच्यासारख्या संगीत, साहित्यिक, क्रीडा, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात (चौकट)
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button