महानगरपालिकेत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत थ्री आर सेंटर्सना उत्तम प्रतिसाद
‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत थ्री आर सेंटर्सना उत्तम प्रतिसाद
नवी मुंबई : 8/11/2023 : (भारत सत्य) : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या दिवाळी उत्सवामध्ये ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ हे अभियान जाहीर करण्यात आले असून दिवाळी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अभियानामध्ये लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात असून स्वच्छता आणि प्रदूषण प्रतिबंधातून पर्यावरण संरक्षण या बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने दिवाळीपूर्वी घरोघरी केल्या जाणा-या साफसफाईमध्ये नागरिकांकडून त्यांना नको असलेल्या चांगल्या वस्तू मोठया प्रमाणावर कच-यामध्ये टाकून दिल्या जातात. वास्तविकत: या वस्तू गरजूंच्या वापरात येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी साफसफाईतून बाजूला काढलेल्या अशा नको असलेल्या वस्तू नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या थ्री आर सेंटर्समध्ये आणून ठेवाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फत करण्यात आले होते, जेणेकरुन ज्यांच्या उपयोगी पडतील असे गरजू नागरिक त्या वस्तू सेंटर्स मधून घेऊन जातील.
‘नको असेल ते दया, हवे असेल ते घ्या’ या आगळया वेगळया संकल्पनेवर आधारित ‘आहे रे’ वर्गाला ‘नाही रे’ वर्गाशी जोडणारी 92 इतक्या मोठया संख्येने ‘थ्री आर सेंटर्स’ नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विभागांमध्ये सुरु केली असून दिवाळीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन नागरिक घरात दिवाळीपूर्व साफसफाई करताना आढळलेल्या आपल्याला नको असलेल्या चांगल्या वस्तू मोठया प्रमाणात आपल्या घराजवळच्या थ्री आर सेंटर्समध्ये आणून ठेवत आहेत व त्या वस्तू ज्यांना आवश्यक आहेत असे गरजू नागरिक तेथून घेऊन जात आहेत.
‘मानवतेचे देणे घेणे’ या नावाने नवी मुंबईं महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणा-या या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद लाभला असून बिंदुरा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने या ‘थ्री आर’ सेटर्सची एक समाजपयोगी उपक्रम म्हणून नियमीत देखभाल केली जात आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरही ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ या अभियानांतर्गत आयुक्तांनी केलेल्या आवहानास अनुसरुन थ्री आर सेंटर्सला वस्तू देणारे व वस्तू घेणारे अशा दोन्ही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.