राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनासह शिकवणुकीवर विद्यार्थी करणार लेखन

मुंबई, दि. 25 : विद्यार्थ्यांना वाचनाची तसेच लिहिण्याची आवड निर्माण व्हावी, त्यासोबतच महान व्यक्तींची एैतिहासिक कामगिरी कळावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि शिकवणुकीवर आधारित लेखन करतील, अशी माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिली आहे.

राज्य शासन, युनिसेफ आणि रीड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राज्यभरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यावर विद्यार्थी जास्तीत जास्त एका पानाचे लेखन करतील. याबाबत विद्यार्थ्यांनी केलेले लेखन दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इतरांकडून पडताळणी केली जाईल.

वाचन चळवळीची उद्दिष्टे

वाचनाचे महत्व सांगणे आणि इयत्ता तिसरीपर्यंत प्रत्येक मुलाला कुशलतेने वाचायला शिकविणे. मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसहभागातून कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन व्यापक लोकवाचन चळवळ उभी करणे. मुलांमध्ये वाचनाची आवड रुजविण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे. वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडविणे. रसग्रहण दृष्टी प्राप्त होणाऱ्या कथा, कविता, कादंबरी, नाटके यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे. मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण करणे आदी या चळवळीची उद्दिष्टे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button