स्थानिक ‘शिवप्रेमीं’च्या सहकार्य, समन्वयातून शिवनेरीवरील ‘महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करा -उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई, दि. 25 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून किल्ले शिवनेरी (जि.पुणे) परिसरात आयोजित ‘महादुर्ग 2024’ महोत्सव सर्वांना सोबत घेऊन भव्य-दिव्य प्रमाणात साजरा व्हावा. महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनात स्थानिकांचा सहभाग वाढवावा. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन नियोजन करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या पर्यटन विभागाच्यावतीने जुन्नर येथील शिवनेरी किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महादुर्ग 2024’ महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. या बैठकीस जुन्नरचे आमदार अतुल बेणके, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करुन रयतेचे स्वराज्य स्थापन केले. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा व्हावा. पर्यटन विभागाच्यावतीने दि. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान किल्ले शिवनेरीवर घेण्यात आलेला ‘महादुर्ग’ महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. यंदाच्या महोत्सवाला भेट देणाऱ्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत दिल्या.
तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करुन देण्यासाठी, देशी-विदेशी पर्यटकांमध्ये राज्यातील गड-किल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी, राज्यातील पर्यटन स्थळे, कला संस्कृती व पाककृती यांचे दर्शन घडविण्यासाठी महादुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन सचिव श्रीमती भोज यांनी या बैठकीत दिली.