रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त मजुरांना कामे उपलब्ध करून द्या – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर


दिशा समिती सभा संपन्न
धाराशिव दि.18 (जिमाका) जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि मजुरांना जिल्ह्यातच जास्तीत जास्त कामे रोजगार हमी योजनेतून उपलब्ध करून देतांना त्यामाध्यमातून विकास कामे करण्यात यावी.असे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.
आज 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित दिशा समितीच्या सभेत खासदार राजेनिंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्री.राजेनिंबाळकर यावेळी म्हणाले,आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच महावितरणच्या विविध कामांसाठी 1302 कोटी निधी तर सुरत – चेन्नई रस्त्यापासून रेल्वेस्टेशन व विमानतळाला जोडणारा 800 कोटीचा चाैपदरी रस्ता मंजूर झाला.केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात सुरू आहेत.
खा.राजेनिंबाळकर पुढे म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून कोट्यवधी रुपये जिल्ह्याला मिळाले. या योजना जिल्ह्यात वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण व्हाव्यात यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा आहे. यापूर्वीही जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत.
धाराशिव बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने खासदार राजेनिंबाळकर व आमदार पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या.सर्व्हिस रोडसाठी 68 कोटीं रुपयांचा निधी मंजूर असून तेथे अंडरपास रोडही करण्यात यावा तसेच उमरगा – सोलापूर महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना बंद पडू नये म्हणून सौरउर्जा युनिट उभारण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
धाराशिव शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग दिसत आहे,7 दिवसात ठेकेदाराला कचरा उचलण्यास सांगण्यात यावे.असे सांगून खासदार राजेनिंबाळकर म्हणाले,बाल संगोपन योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला.सभेला विविध विभागाचे विभाग प्रमुख,तहसीलदार, गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेसह तालुका यंत्रणाचे अधिकारी देखील उपस्थित होते.