तरुणाईने रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 2/1/2024 :- धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ही रक्तदान करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. आनंद दिघे यांनी घालून दिलेली शिकवण पुढे नेण्यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद होऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याऐवजी रक्तदान करून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.
ठाणे शहरात दरवर्षी मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर आणि राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या कार्यक्रमात रक्तदान केले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, सौ. मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते रक्तानंद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या क्षेत्रात काम करणारे अन्य मान्यवर संस्था आणि व्यक्तींचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात काही दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचे आणि साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, संपूर्ण जगभरात अशा पद्धतीने नववर्षाचे स्वागत करणारा असा हा एकमेव कार्यक्रम असून गेली 29 वर्षे हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, असे आपण म्हणतो. काही वर्षापूर्वी नवरात्रीचे नऊ दिवस याच मैदानात असे महारक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरात 11 हजारांहून अधिक दात्यांनी सहभाग घेतला. नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुणांनी स्वतःहून पुढे येऊन रक्तदान केले याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच या सोहळ्यात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, संस्थांचे, डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या ठाणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईसह महाराष्ट्रात सध्या “डीप क्लिन ड्राइव्ह” सुरू असून “सुंदर शहरे-स्वच्छ शहरे-हरित शहरे” ही संकल्पना राबवित आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम आता शहरात जागोजागी दिसू लागले आहेत. आता हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ “गेट वे ऑफ इंडियावर” करण्यात आला. मुंबईत आज 10 ठिकाणी “डीप क्लिन ड्राइव्ह” मोहीम राबविण्यात आली असून त्या मोहिमेशी 1 लाख नागरिक प्रत्यक्ष जोडले गेले होते. आपण हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवत असून त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.
तसेच गेल्या दीड वर्षात सरकारने प्रत्येक निर्णय सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. परदेशी गुंतवणुकीत राज्याने कर्नाटक, गुजरातला मागे टाकून पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे. अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आजही महाराष्ट्राला पहिली पसंती देत आहेत. गतवर्षी दाओसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून त्यातील 85 टक्के करारानुसार कामे सुरू झाली असून यंदाही राज्यात विक्रमी गुंतवणूक घेऊन येवू, असे यावेळी त्यांनी सांगितले.
याक्षणी सर्वाधिक विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत. त्यामुळे आगामी वर्ष देखील महाराष्ट्राचेच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
0000