पालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही,फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन


नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई 13/11/2023 : नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी यांची भरती सुरू असून तशा प्रकारच्या खोट्या जाहिराती, सूचना प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. याबाबत काही व्यक्ती / संस्थांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचा तसेच महानगरपालिकेचा खोटा स्टॅम्प बनवून त्याचाही वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वास्तविकत: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कोणत्याही पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला अथवा जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये तसेच संभाव्य आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील भरती किंवा कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेची वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. (अधिकृत फेसबुक वरुन)
****