भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. 26- गुलामगिरी मानसिकता झुगारून आजची भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तीन दिवस सुरु असलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारोहावेळी केले.

देशाची प्रगती आणि जागतिक शांततेच्या उद्देशाने युवा चेतनातर्फे आयोजित केलेल्या श्री विद्या लक्षार्चन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह होते.

विद्या लक्षार्चन समारंभामुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे सांगून आणि उपस्थित संतांचे स्वागत करून श्री. फडणवीस म्हणाले, भारत पुन्हा एकदा आपली हरवलेली अस्मिता परत मिळवताना दिसतोय. एकेकाळी भारत जगाला विचार देत होता. विचाराबरोबर व्यवहार आणि व्यापारात तसेच सामरिक ताकदीमध्येही भारत जगात अग्रेसर होता. परंतु तो हळुहळू गुलामीच्या साखळदंडात जखडत गेला. विचारांच्या गुलामगिरीमुळे देशाची अधोगती झाली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यावर मात करून भारत नव्या आत्मविश्वासाने उभा राहत आहे. सनातन विचार देशात पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहेत. नित्यनूतन असा हा सनातन विचार आहे. सनातन म्हणजे जो कधीही समाप्त होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे वळत असल्याचेच हे निदर्शक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हा विकसित भारत म्हणजे रामराज्य होय. राजाला जे स्थान असेल तेच स्थान रामराज्यात तळातल्या माणसाला असते, असे रामराज्य प्रस्थापित करण्याला आपले प्राधान्य आहे. येत्या २२ जानेवारीला आपण रामलल्लाची जन्मस्थानी प्रतिष्ठापना करीत आहोत, हा देशवासीयांसाठी भावूक करणारा क्षण आहे. सनातन धर्माचे विश्वरूप आपल्याला राम मंदिराच्या पुनर्निर्माणात पाहायला मिळेल. ही आत्मविश्वासाची नवी सुरुवात असून त्यानंतर मागे वळून पाहावे लागणार नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रे, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button